Type Here to Get Search Results !

वाघोलीच्या बॉक्सर्सची कोल्हापुरात सुवर्णभरारी! सीबीएसई दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ८ पदकांची लयलूट; पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 वाघोलीच्या बॉक्सर्सची कोल्हापुरात सुवर्णभरारी!

सीबीएसई दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ८ पदकांची लयलूट; पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


प्रतिनिधी: विनायक साबळे 


कोल्हापूर येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या ‘सीबीएसई साऊथ झोन बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत वाघोली बॉक्सिंग क्लबच्या मुष्टियोद्ध्यांनी दमदार कामगिरी करत २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण ८ पदके पटकावली. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ, दादरा-नगर हवेली तसेच दमण-दीवमधील २१० शाळांमधील सुमारे ११०० खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला मोठी चुरस होती.

या स्पर्धेत पूर्वा सातव आणि यथार्थ सातव यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले. अनुश्री पाटील, मानस पाटील आणि स्वराज कोळपे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळवले. या पाचही खेळाडूंची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


तर साईराज जाधव, विराट जाधव आणि श्रुतिका सातव यांनी दमदार लढत देत कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेत आक्रमक आणि चाणाक्ष खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या अनुश्री पाटील हिच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली. तिला आयोजकांकडून ‘प्रॉमिसिंग बॉक्सर’ (उदयोन्मुख प्रतिभावान बॉक्सर) या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.


वाघोलीच्या या मुष्टियोद्ध्यांच्या यशामागे प्रशिक्षक बळीराम जाधव, सूर्यकांत दूधभाते आणि रोहन मडके यांचे कठोर परिश्रम व मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल वाघोलीतील क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.




Post a Comment

0 Comments