Type Here to Get Search Results !

वाघोलीत खून करून शिरूरच्या दिशेने पळाले; कोरेगाव भीमात शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पकडले

होमगार्ड/ट्रॅफिक वॉर्डन ने आरोपी पकडून देण्यात मोलाची मदत केली; मात्र वाघोली पोलिसांकडून कारवाईचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न?




प्रतिनिधी : विनायक साबळे 

 

शिक्रापूर : वाघोली येथे तरुणाचा खून करून शिरूरच्या दिशेने पसार झालेल्या आरोपींना कोरेगाव भीमा परिसरात शिक्रापूर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले. या कारवाईत होमगार्ड/ ट्रॅफिक वॉर्डनने प्रसंगावधान राखत आरोपींचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडून देण्यासाठी मोलाची मदत केली. मात्र, या कामगिरीचे श्रेय नेमके कोणाला द्यायचे, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.


वाघोली बाजारतळ मैदानावर २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवनाथ दिंगबर सोन्नर यांच्यावर आठ जणांनी हल्ला केला. आरोपींनी स्वीफ्ट कारने त्यांना जोरदार धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यात गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोन्नर यांचा मृत्यू झाला.


घटनेनंतर आरोपी शिरूरच्या दिशेने पसार झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांना मिळाली. त्यांनी तत्काळ शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती दिली. त्यानंतर यादव यांनी पोलिस पथकाला सतर्क करून पुणे-अहिल्यानगर मार्गावर रवाना केले.


दरम्यान, आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर होमगार्ड/ट्रॅफिक वॉर्डननेही महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांना मदत केली. संशयित वाहनाचा माग घेण्यापासून ते आरोपींना पकडून देण्यापर्यंत होमगार्ड/ वॉर्डनच्या तत्परतेचा पोलिसांना मोठा फायदा झाला. अखेर कोरेगाव भीमा परिसरात सापळा रचून बालाजी सोनाजी घनवटे (वय २२) आणि नामदेव बाळासाहेब आळनुरे, दोघेही रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी, यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.


होमगार्ड/ट्रॅफिक वॉर्डनची कामगिरी; श्रेय मात्र कुणाचे?


या कारवाईनंतर शिक्रापूर पोलिसांनी होमगार्ड /ट्रॅफिक वॉर्डनच्या भूमिकेची दखल घेत त्यांचा पेन देऊन सत्कार केला. प्रसंगावधान आणि तत्परतेचे कौतुक करण्यात आले. वाघोली पोलिसांनीही मोठे पणा दाखवत होमगार्ड/ट्रॅफिक वॉर्डनच्या भूमिकेची दखल घेत त्यांच्या कामगिरीची पाठ थोपटावी


मात्र, दुसरीकडे आरोपी पकडण्याच्या संपूर्ण कारवाईचे श्रेय वाघोली पोलिसांकडून स्वतःकडे घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात आरोपींना पकडण्यात शिक्रापूर पोलिसांसोबत होमगार्ड/ ट्रॅफिक वॉर्डनची भूमिका महत्त्वाची असताना, प्रसिद्धीमध्ये मात्र कारवाईचे श्रेय एका यंत्रणेकडेच जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


खरंतर गुन्हेगारांना पकडणे ही पोलिसांची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, ज्या होमगार्ड /ट्रॅफिक वॉर्डनने प्रत्यक्ष घटनास्थळी आणि आरोपींच्या शोधात मोलाची मदत केली, त्यांच्या भूमिकेचे योग्य श्रेय आणि कौतुक होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


या प्रकरणी वाघोली पोलिस ठाणे, पुणे शहर येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५१(२), १८९(२)(४), १९०, १९१(१)(३) अन्वये गुन्हा दाखल आहे.


ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलिस हवालदार अमोल दांडगे, संदिप बनकर, पोलिस अंमलदार बडे, आव्हाड, केंद्रे तसेच होमगार्ड /ट्रॅफिक वॉर्डन जमादार यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments