वाघोलीतील ड्रेनेज समस्येची महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतली तात्काळ दखल!
व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी; अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना...!
प्रतिनिधी:विनायक साबळे
वाघोली : वाघोली परिसरातील ड्रेनेज कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची महापौर मंजूषा नागपुरे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस संदिप सातव यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि त्यांच्या समस्या महापौरांपर्यंत पोहोचवल्यानंतर महापौरांनी तत्काळ कार्यवाही करत व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित परिसराची पाहणी केली.
व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी करताना महापौरांनी नागरिकांशी थेट संवाद साधून ड्रेनेजच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडचणी, ये-जा करताना होणारी गैरसोय तसेच दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांची माहिती जाणून घेतली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजित नायर यांना व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी करून घेतले. यावेळी वाघोलीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांमुळे नागरिकांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागू नये, यासाठी कामांमध्ये आवश्यक समन्वय ठेवून समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नागरिकांची समस्या समोर येताच ती थेट महापौरांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने प्रशासनाकडून कार्यवाही करून घेण्यासाठी संदिप सातव यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम यापुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापौरांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वाघोलीतील ड्रेनेज समस्येवर लवकरच आवश्यक उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments