‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी
प्रतिनिधी : विनायक साबळे
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल ६ हजार ५८६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांमध्ये ३ लाख १ हजार ८४३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यात उपक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे यांनी केला.
पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भाग, नगरपालिका, नगरपंचायती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.
शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, विविध रक्त तपासण्या, हृदयविकार, किडनीविकार, कर्करोग, दंतरोग, संसर्गजन्य आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. महिलांसाठी स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणीही करण्यात आली. तसेच फिजिओथेरपी, आयुर्वेद उपचार, आयुष्मान कार्ड व अवयवदान नोंदणीबाबत सुविधा आणि मार्गदर्शन देण्यात आले.
तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित शासकीय, निमशासकीय आणि धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. पात्र नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय योजनांसह विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, शासकीय व धर्मादाय रुग्णालये, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. विविध यंत्रणांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
“नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि गरजेनुसार पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. पुणे जिल्ह्यात विविध यंत्रणा, गणेश मंडळे, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.” अशी माहिती
, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली

Post a Comment
0 Comments