Type Here to Get Search Results !

चाकणनंतर रांजणगाव-सणसवाडीतही स्थलांतराची भीती

 पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा उद्योगांना फटका; चाकणनंतर रांजणगाव-सणसवाडीतही स्थलांतराची भीती



पुणे : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर परिणाम रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत, सणसवाडी आणि कोरेगाव परिसरातील उद्योगांवर होत आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी Industrial Federation of Maharashtra (IFM) – Region च्या वतीने मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.


या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात कामगार, अवजड वाहने, कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक होते. मात्र, वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे असल्याने वाहने अनेकदा तासन्तास कोंडीत अडकतात. याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे.


दरम्यान, चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीला कंटाळून काही उद्योगांनी स्थलांतराचा विचार सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रांजणगाव–सणसवाडी–कोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीवर वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास येथील उद्योगांनाही भविष्यात स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, असा इशारा IFM ने दिला आहे.


महाराष्ट्रात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यमान उद्योग टिकवणे आणि रोजगाराचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून उद्योग, रोजगार आणि राज्याच्या आर्थिक विकासाशी संबंधित असल्याचे IFM ने पत्रात नमूद केले आहे.


रांजणगाव–सणसवाडी–कोरेगाव परिसरातील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.


“चाकणप्रमाणे रांजणगाव–सणसवाडी परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करण्याची वेळ येऊ नये,” यासाठी शासनाने वेळीच ठोस पावले उचलून उद्योगांना दिलासा द्यावा, अशी मागणी Industrial Federation of Maharashtra (IFM) – Region च्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments