पेन्शनच्या नावाने आलेली फाईल... आणि आयुष्यभराची कमाई काही तासांत साफ!
प्रतिनिधी : विनायक साबळे
शिक्रापूर : न्हावरे (ता. शिरूर) येथील एका सेवानिवृत्त सैनिकाच्या बँक खात्यातील तब्बल २८ लाख ७२ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने गायब झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावरे येथील सेवानिवृत्त सैनिक जयसिंग भोसले यांचे बँक ऑफ इंडिया बँकेत खाते असून, त्यामध्ये भोसले यांच्या पेन्शनसह अन्य व्यवहारांचे पैसे ठेवलेले असतात. १२ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त सैनिक जयसिंग भोसले यांच्या बँक खात्यातून काही रक्कम वजा झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. मात्र, भोसले यांनी बँकेतून कोणतेही व्यवहार केले नसल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या दोन बँक खात्यांमधील तब्बल २८ लाख ७२ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचे समोर आले.
याबाबत सेवानिवृत्त सैनिक जयसिंग नरसिंग भोसले (वय ६५, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.

Post a Comment
0 Comments