Type Here to Get Search Results !

भर सकाळी सकाळी गोळीबार, परिसरात एकच खळबळ

 भर सकाळी सकाळी गोळीबार, परिसरात एकच खळबळ



प्रतिनिधी : विनायक साबळे 


शिरूर शहरात आज सकाळी भरवस्तीत झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरले आहे. लाटेआळी, आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


सकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.


घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.


पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून, गोळीबारात वापरलेल्या काडतुसांचे अवशेष घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हरी गंगावणे यांच्यावर गोळीबार कोणी आणि का केला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.


दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी शिरूर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरही गोळीबाराची घटना समोर आली होती. त्यानंतर पुन्हा शिरूर शहरातच भर सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


या पार्श्वभूमीवर शिरूर शहर आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान शिरूर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन गोळीबारामागील नेमके कारण समोर आणणे, हे पोलिसांसमोरचे आता महत्त्वाचे आव्हान आहे.


गोळीबाराच्या या घटनेमुळे शिरूर शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासातून या घटनेमागचे नेमके कारण आणि आरोपी कोण, हे स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments