रांजणगावात पुन्हा रक्तरंजित हल्ला; कोयता, दगड अन् फायटरने तरुणांवर हल्ला!
शिरूर तालुक्यात हिंसक घटनांची मालिका; काही दिवसांतच हल्ले आणि गोळीबाराने वाढली चिंता
प्रतिनिधी : विनायक साबळे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मारामारी, हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांनी खळबळ उडवली असतानाच रांजणगाव गणपती परिसरात पुन्हा एकदा रक्तरंजित हल्ल्याची घटना समोर आली आहे. वामन वाईन्स परमिट रूमसमोर तरुणासह त्याला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर टोळक्याने कोयता, दगड, काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार १८ सप्टेंबर रोजी रात्री घडला.
या प्रकरणी आदित्य तुषार शितोळे (वय १९, रा. रांजणगाव गणपती) यांच्या फिर्यादीवरून धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह ६ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गर्दी जमवून शितोळे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, दगडाने व फायटरने मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दादा खेडकर यांच्यावरही कोयता, दगड व काठीने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे, शिरूर शहरातही १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबारात हरीश गंगावणे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
त्यामुळे रांजणगावसह शिरूर तालुक्यात हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त, संशयितांवर नजर आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत असून, गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक मोरडे यांनी दाखल केला आहे.

Post a Comment
0 Comments