क्रशरच्या धुळीने नागरिक हैराण; विजय जाचकांचा प्रदूषण मंडळाला इशारा!
प्रतिनिधी : विनायक साबळे
वाघोली, लोणीकंद, फुलगाव आणि तुळापूर परिसरातील कथित बेकायदा खडी क्रशरमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ, वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुका नगर रोड मंडल अध्यक्ष विजय अनिलराव जाचक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात जाचक यांनी पुणे प्रादेशिक कार्यालयातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. परिसरातील नागरिकांकडून प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
वाघोली-लोणीकंद-फुलगाव-तुळापूर परिसरातील सर्व संबंधित क्रशरची प्रत्यक्ष पाहणी करून परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी जाचक यांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणारे किंवा बेकायदा सुरू असलेले क्रशर तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरातील तब्बल ३९ खाण-क्रशर उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा असलेल्या बँक गॅरंटी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईची चर्चा सुरू असतानाच इतर क्रशरवरही कारवाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मात्र, एका क्रशर व्यावसायिकाने या कारवाईच्या व्याप्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. परिसरात जवळपास १४० खाण-क्रशर असताना केवळ ३९ क्रशरवरच कारवाई का करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कारवाईची प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीबाबतही पारदर्शकता असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे आता ३९ क्रशरवर झालेली कारवाई नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली, उर्वरित क्रशरची तपासणी झाली आहे का आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीचे निकष काय होते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने ठोस कारवाई केली नाही, तर पुणे कार्यालयासमोर भाजपच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजय जाचक यांनी दिला आहे.
एकीकडे प्रदूषणाच्या तक्रारी, दुसरीकडे ३९ क्रशरवरील कारवाई आणि आता उर्वरित क्रशरबाबत उपस्थित झालेले प्रश्न, यामुळे वाघोली-लोणीकंद-फुलगाव-तुळापूर परिसरातील क्रशर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]() |


Post a Comment
0 Comments