सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची भोसलेनगरातील आरोग्य शिबिरास भेट
प्रतिनिधी : विनायक साबळे
पुणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत भोसलेनगर, हडपसर येथील युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कोथळीकर यांनी नागरिक, डॉक्टर, गणेश मंडळाचे स्वयंसेवक व सोसायटी सदस्यांशी संवाद साधून शिबिरातील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्यांनी स्वतः हिमोग्लोबिनची तपासणी करून घेत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.
शिबिरात तब्बल ३५४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, हृदयरोग, कर्करोग, रक्त तपासणी, नेत्र व दंतरोग तपासणी तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय रक्तदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराला सुमारे २५० सोसायटी सदस्य व गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
“उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असून, नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते,” असे दिनेश कोथळीकर यांनी सांगितले. नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अधीक्षक अभिजीत अनाप, मा. जिल्हा न्यायाधीश श्री. गोसावी, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सागरराजे भोसले, वंशराजे भोसले, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक समर्थ सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते अमित जागडे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या सामाजिक सहभागाला आरोग्य जनजागृतीची जोड देत ‘उत्सव आनंदाचा, संदेश निरोगी आरोग्याचा’ हा संदेश या अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments