राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या ठाण्यात सन्मान
प्रतिनिधी : विनायक साबळे
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. २७ सप्टेंबर) ठाणे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे भूषविणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ठाणे येथील गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मराठवाडा जनविकास परिषद गेल्या १७ वर्षांपासून मराठवाड्यातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मराठवाडा बहुभाषिक दिन सोहळ्यात यंदा प्रा. डॉ. मंगेश कराड यांची ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याच सोहळ्यात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना ‘मराठवाडा मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. मंगेश कराड हे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठात शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळच्या योगदानाची दखल घेत त्यांची ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments