Type Here to Get Search Results !

१८ जण ठरले ‘चॅम्पियन’; ग्लोमाईंडची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा गाजली



प्रतिनिधी : विनायक साबळे 


पुणे : ग्लोमाईंड अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी माऊली लॉन्स, मांजरी खुर्द येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


विविध भागांतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जलद गणना, अचूकता, एकाग्रता आणि वेळेचे नियोजन यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आणि गणन कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेमुळे पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.


पारितोषिक वितरण समारंभास ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, नगरसेविका, पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “स्पर्धेच्या युगात मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अबॅकस उपयुक्त आहे. अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची गणनाक्षमता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.”


यावेळी सतीश रामराव कुमदाले, ज्येष्ठ साहित्यिक, पुणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. वाचन, ज्ञानवृद्धी, जिज्ञासू वृत्ती, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शिक्षणासोबतच चांगले संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चॅम्पियन, प्रथम ते नववा क्रमांक, मास्टर अबॅकस तसेच विविध विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. तसेच मंगल विशाल शेळके यांना ‘स्टार टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी केलेले शैक्षणिक कार्य, मेहनत आणि योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


१८ विद्यार्थ्यांचा ‘चॅम्पियन’ म्हणून गौरव


स्पर्धेत सनिध्या बैगणे, संस्कृती विलास मुळे, अर्णव निखिल पाटील, सृष्टी नवलें, रितिका राय, सारा सचिन उंद्रे, कुश निलेश घोसाळ, ओम काकडे, सात्विक विठ्ठल महाले, देवांश सतीश चौधरी, अनायता शॉ, श्रीजीत सोमनाथ बरकडे, पहल वर्मा, वल्लरी विक्रम शिंदे, अदिती संतोष वाईकर, आदित्य आमरेश राठोड, श्रेया योगेश खेडेकर आणि काश्वी राठोड या १८ विद्यार्थ्यांचा ‘चॅम्पियन’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला.


विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी भविष्यातही अशा स्पर्धा व विविध शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे अकॅडमीच्या वतीने सांगण्यात आले.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंगल खेडेकर, मिरा शेळके, रेश्मा देशमुख, सीमा कदम आणि मंगल शेळके यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले. मान्यवरांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.

Post a Comment

0 Comments