कोरेगाव भीमात मटका जुगार पुन्हा बिनधास्त!
पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी : विनायक साबळे
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी पुन्हा छापा टाकून कारवाई केली. वढू रोडलगत खुशबू मटण शॉपसमोर पत्र्याच्या आडोशाला मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य व रोकड जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हवालदार श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, अमोल दांडगे, अजित इंगवले, विकास सरोदे व नारायण वाळके यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी नागरिकांकडून पैसे स्वीकारून कागदावर आकडे लिहून मटका जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करत मटका जुगाराचे साहित्य व रोकड ताब्यात घेतली.
या प्रकरणी श्रावण गुपचे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून इर्शाद भगवान (सध्या रा. सोमेश्वरनगर, लोणीकंद, ता. हवेली; मूळ रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मटका सुरूच; पडद्यामागे ‘ वरदहस्त’ कोणाचा?
पोलिसांची कारवाई, गुन्हे दाखल आणि जप्तीची कारवाई होऊनही कोरेगाव भीमा परिसरात मटका जुगार पुन्हा सुरू होत असल्याने आता या अवैध धंद्याच्या पडद्यामागील राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा धंदा सुरू राहतोच कसा? कारवाईनंतरही मटका पुन्हा डोके वर काढतोच कसा? या अवैध धंद्याला स्थानिक पातळीवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
केवळ मटका चालविणाऱ्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही; या धंद्याला संरक्षण किंवा पाठबळ देणाऱ्या पडद्यामागील व्यक्तींची भूमिका तपासली जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment
0 Comments