शंभूराजांच्या स्मृतीस्थळी विद्यार्थ्यांना प्रेरणेची शिदोरी; विद्यार्थ्यांनी अनुभवला इतिहास
कोरेगाव भिमा : श्रावणी सहलीच्या माध्यमातून इतिहास केवळ पानांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेला अभिवादन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन केले. ऐतिहासिक स्थळाला प्रत्यक्ष भेट दिल्याने विद्यार्थ्यांना इतिहासाची अनुभूती मिळून त्यांच्या मनात स्वराज्याचा अभिमान व राष्ट्रनिष्ठेची भावना अधिक दृढ झाली.
“शंभूराजांचा इतिहास केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यागभूमीला भेट देऊन अनुभवावा. अशा भेटी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि इतिहासाची जाण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात,” असे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, यासाठी शाळा-महाविद्यालयांनी अशा शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, असे आवाहनही साकोरे यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा टी.डी.एफ. अध्यक्ष तथा शिक्षक नेते सोमनाथ भंडारे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. श्री शरदचंद्र पवार विद्यालय, वढू बुद्रुकचे मुख्याध्यापक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक-शिक्षिका, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments