Type Here to Get Search Results !

शिरूर पुन्हा हादरलं! भल्या सकाळी बंदुकीचा बार; कारेगावात हमजा शेख यांचा गोळीबारात मृत्यू!

 शिरूर पुन्हा हादरलं! भल्या सकाळी बंदुकीचा बार; कारेगावात हमजा शेख यांचा गोळीबारात मृत्यू!



प्रतिनिधी : विनायक साबळे 


शिरूर : शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा भल्या सकाळी झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. कारेगाव येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लांटमध्ये कामावर गेलेल्या ३९ वर्षीय हमजा उस्मान शेख यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सकाळी घडली. या घटनेने कारेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हमजा शेख हे साईनगर परिसरात कुटुंबासह राहत होते. विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या ‘समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये ते काम करत होते. नेहमीप्रमाणे सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ते कामासाठी प्लांटमध्ये गेले होते.


दरम्यान, सकाळी पावणेसातच्या सुमारास शेजारील एका महिलेने हमजा यांच्या पत्नीला पाण्याच्या प्लांटमध्ये त्यांचे पती पडले असून, त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता हमजा शेख हे रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले आढळून आले.


घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने काही वेळापूर्वी फटाक्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर इमारतीच्या मालकांनी रुग्णवाहिका बोलावली. हमजा यांना कुटुंबीय व प्लांटमधील कामगारांच्या मदतीने शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.


सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेह शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि आरपार छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. त्यानंतर मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.


दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पाण्याच्या प्लांटमध्ये गोळीची पुंगळी आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने पिस्तुलातून गोळी झाडून हमजा शेख यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


या प्रकरणी हमजा शेख यांच्या पत्नी अबिताबी हामजा शेख यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३(२५) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील पुरावे, संभाव्य सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.


गोळीबार नेमका कोणी केला? हमजा शेख यांनाच लक्ष्य करण्यामागचे कारण काय? हल्लेखोर किती होते आणि या घटनेमागे नेमका कोणता हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत.


मागील आठवड्यात सकाळच्या वेळी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा भल्या सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने शिरूर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments