Type Here to Get Search Results !

वाहतूक शाखेच्या विभाजनानंतरही कोंडी कायम; उपाययोजना नेमक्या कुठे?

 लोणीकंदला स्वतंत्र वाहतूक शाखा, पोलीस निरीक्षकांची नियुक्ती; तरीही रस्त्यावर प्रभावी नियोजनाची गरज



प्रतिनिधी : विनायक साबळे 


लोणीकंद : वाघोली वाहतूक शाखेचे विभाजन करून लोणीकंदसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करण्यात आली असून, या शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. स्वतंत्र शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने लोणीकंद परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र लोणीकंद आणि तुळापूर फाटा परिसरातील वाहतूक कोंडी अद्याप कायम असून, काही वेळा परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे.


यापूर्वी वाघोली वाहतूक शाखेअंतर्गत हा परिसर येत असताना पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित राहून वाहतूक नियोजन आणि नियंत्रण करत होता. आता स्वतंत्र शाखा निर्माण करून पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असतानाही वाहतूक व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


वाघोली, केसनंद, तुळापूर फाटा, लोणीकंद आणि पुणे-अहिल्यानगर महामार्ग परिसरात विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.


केवळ शाखा वाढवून प्रश्न सुटणार नाही


वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ स्वतंत्र शाखा निर्माण करणे पुरेसे नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः महत्त्वाच्या चौकांवर आणि कोंडीच्या ठिकाणी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या वेळेतील वाहतुकीचा प्रवाह, अडथळ्यांची ठिकाणे, अनधिकृत पार्किंग आणि वाहनचालकांकडून होणारे नियमभंग यांचा अभ्यास करून त्यानुसार प्रभावी नियोजन करणे गरजेचे आहे.


वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, रस्त्याच्या कडेला किंवा नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी न करणे, लेनची शिस्त पाळणे आणि कोंडीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक न करणे आवश्यक आहे.


प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि नागरिकांचे सहकार्य यांचा समन्वय झाल्यासच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येईल.


शाखा स्वतंत्र झाली, अधिकारीही उपलब्ध झाले; आता अपेक्षा आहे ती त्याचा परिणाम रस्त्यावर दिसण्याची. लोणीकंद-तुळापूर फाटा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून ठोस आणि वेळबद्ध कृती आराखडा राबवावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.


आज देखील पुणे–अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडीचा फटका बसला लोणीकंदपासून तुळापूर फाटा, कोरेगाव आणि वाघोलीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकरमानी तासन्तास कोंडीत अडकले असून, रांजणगाव आणि कोरेगाव एमआयडीसीतील कामगारांचे अक्षरशः हाल होत आहेत!

कामावर जाण्याची वेळ असो किंवा कामावरून घरी परतण्याची वेळ, वाहतूक कोंडीमुळे कामगारांचा मोठा वेळ रस्त्यावरच वाया जात आहे. वाहनांची संख्या वाढत असताना वाहतुकीचा वेग मात्र कमालीचा मंदावला आहे.

या कोंडीचा फटका कामगारांसह वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनाही बसत आहे. वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments