विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार; ‘पोलीस काका व दीदी’ उपक्रमाचा शुभारंभ
प्रतिनिधी:विनायक साबळे
शिक्रापूर : विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘पोलीस काका व दीदी’ या उपक्रमाचा शुभारंभ वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या संकल्पनेतून, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार, पोलीस हवालदार जयराज देवकर, योगेश आव्हाड आणि महिला पोलीस पूजा सावंत यांनी विद्यार्थिनींना सुरक्षा मार्गदर्शन केले.
संकटाच्या वेळी प्रसंगावधान राखणे, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे आणि त्रास जाणवल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तातडीने सांगणे, याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन मदतीसाठी ११२, महिला हेल्पलाइन १८१ आणि बालकांसाठी १०९८ या क्रमांकांची माहितीही देण्यात आली.
विद्यार्थिनींनी निर्भयपणे पुढे यावे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.

Post a Comment
0 Comments