प्रतिनिधी : विनायक साबळे
पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे, असे मत MPSC आंदोलक श्रीनिवास गुट्टे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा संघर्ष हा कोणाच्याही राजकीय महत्त्वाकांक्षेचे साधन बनता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी आणि सरकार यांच्यातील नाते हे पालक आणि लेकरासारखे असते. मतभेद किंवा संघर्ष होऊ शकतो; मात्र संवाद, विश्वास आणि परस्पर समन्वय कायम राहणे आवश्यक आहे. सरकारच्या निर्णयांमध्ये त्रुटी असतील, तर त्या निदर्शनास आणून देत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम भूमिका मांडण्याची ताकद MPSC विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे गुट्टे यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांना कोणाच्या नेतृत्वाची किंवा दिशादर्शनाची गरज नाही. आपल्या हक्कांसाठी लढण्याची ताकद आणि हिंमत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. विद्यार्थ्यांचा आवाज विद्यार्थ्यांमध्येच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्वतःची राजकीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर अशा प्रवृत्तींनी वेळीच थांबणे गरजेचे आहे, असेही गुट्टे यांनी म्हटले.
“MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा संघर्ष हा कोणालाही नेता बनवण्यासाठी नसून त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी आहे,” असे गुट्टे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनीही कोणाच्याही वक्तव्यावर किंवा दिशाभूल करणाऱ्या विधानांवर अवलंबून न राहता वस्तुस्थिती समजून घेऊन स्वतःची भूमिका ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी आणि सरकार यांच्यातील संवादाची प्रक्रिया खंडित न होता परस्पर समन्वयातून प्रश्न सोडवले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments