Type Here to Get Search Results !

सर्वसामान्यांच्या नावावर कर्ज , कथित लोन फ्रॉडची चौकशीची मागणी.. मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय

सर्वसामान्यांच्या नावावर कर्ज , कथित लोन फ्रॉडची चौकशीची मागणी.. 

मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय



प्रतिनिधी:विनायक साबळे 


 पुणे जिल्हा सह शिरूर तालुक्यात एका नामांकित बँकेच्या विविध शाखांमध्ये बोगस कंपन्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडून सर्वसामान्य नागरिकांच्या नावावर पर्सनल लोन, कार लोन आणि क्रेडिट कार्ड मिळवून कथित आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा गंभीर आरोप निळं वादळ संघटनेच्या अध्यक्षा दीपिका भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निळा वादळ संघटनेच्या दीपिका भालेराव यांनी संबंधित यंत्रणेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


भालेराव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, काही ठिकाणी बोगस अथवा संशयास्पद कंपन्यांच्या नावाने एंटरप्रायजेस अकाउंट उघडण्यात येतात. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कमी शिकलेल्या नागरिकांना हाताशी धरून त्यांच्या नावाने सॅलरी अकाउंट सुरू केले जाते. संबंधित खात्यावर काही महिने नियमित पगार जमा केल्यानंतर त्या खात्याच्या आधारे बँकेकडून पर्सनल लोन, कार लोन तसेच क्रेडिट कार्डच्या ऑफर मिळविल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


या कथित प्रकारात संबंधित नागरिकांकडून सिमकार्ड, बँक पासबुक, एटीएम, ओळखपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्वतःकडे घेतली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित खातेदाराला पूर्ण माहिती न देता त्यांच्या नावावर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सुविधा घेतल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


यामुळे कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी मात्र संबंधित खातेदाराच्या नावावर येत असून, प्रत्यक्षात कर्जाची रक्कम अन्य व्यक्तींकडून वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


निवेदनात या कथित प्रकाराची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक नागरिकांच्या नावावर कर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुविधा घेण्यात आल्या आहेत का, तसेच या व्यवहारांमागे एकच टोळी किंवा संघटित नेटवर्क कार्यरत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


यासाठी संबंधित बँक शाखांमधील एंटरप्रायजेस अकाउंट, सॅलरी अकाउंट, कर्ज प्रस्ताव, केवायसी कागदपत्रे, क्रेडिट कार्ड अर्ज, वाहन कर्जाचे व्यवहार तसेच संबंधित खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


या प्रकरणात बँकेच्या संबंधित शाखांमध्ये खाते उघडताना आणि कर्ज मंजूर करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाली होती का, केवायसी प्रक्रिया नियमांनुसार करण्यात आली होती का आणि संशयास्पद व्यवहारांकडे दुर्लक्ष झाले का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


तसेच जर चौकशीत कर्ज फसवणुकीचे किंवा बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे पुरावे आढळले, तर संबंधित व्यक्तींसह या गैरव्यवहाराला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे.


या कथित प्रकरणात ज्या नागरिकांच्या नावावर त्यांच्या संमतीशिवाय कर्ज किंवा क्रेडिट कार्ड काढण्यात आले असतील, अशा नागरिकांची स्वतंत्र माहिती संकलित करून त्यांची चौकशी करावी. तसेच त्यांच्या नावावर असलेली कर्जे, थकीत रक्कम आणि क्रेडिट व्यवहारांची तपासणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी संबंधितावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही भालेराव यांनी दिला आहे



Post a Comment

0 Comments