टाकाऊ वस्तूंपासून साकारल्या कलात्मक राख्या; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी:विनायक साबळे
वाघोली : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक आश्रमशाळा, वाघोली येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील तब्बल ९० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपलब्ध असलेल्या साहित्याचा तसेच विविध टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. रंगीत कागद, धागे, सजावटीचे साहित्य तसेच टाकाऊ वस्तूंचा कलात्मक वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. विविध आकार, रंग आणि आकर्षक सजावटीच्या राख्यांनी स्पर्धेचे वातावरण रंगतदार झाले.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक . जितेंद्र सोनवणे, शिक्षिका . रत्नमाला जाधव तसेच शिक्षक . विजय फापाळे आणि. गोकुळ शिरोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करून त्यापासून उपयुक्त व सुंदर वस्तू निर्माण करता येतात, तसेच पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि स्वावलंबन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून समजावून देण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटी मुख्याध्यापक. जितेंद्र सोनवणे यांनी स्वतः राख्यांचे परीक्षण केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत रक्षाबंधन सणाचे सामाजिक व भावनिक महत्त्व स्पष्ट केले. भाऊ-बहिणीतील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्परांच्या संरक्षणाची भावना जपण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला राखी मेकिंग स्पर्धा अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.


Post a Comment
0 Comments