शेळी चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद; तीन गुन्ह्यांची कबुली
शिक्रापूर : शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरातून जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली. चौकशीत आरोपीने शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, चोरीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी जप्त केली आहे.
भोईटी उर्फ कृष्णा कांतीलाल काळे (वय २५, रा. नवलाख उंबरे, ता. खेड; मूळ रा. डिगी काळेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७११/२०२६, तर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२५/२०२६ व ७४१/२०२६ अन्वये गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपीची ओळख पटवत त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीनही शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या चोरीमध्ये आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर (एमएच १४ एलव्ही ११५०) पोलिसांनी जप्त केली असून, आरोपी व वाहन पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीचा अन्य चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील तसेच पोलिस अंमलदार सागर धुमाळ यांच्या पथकाने केली.

Post a Comment
0 Comments