Type Here to Get Search Results !

MSIDCचा सावळा गोंधळ; आंदोलनकर्त्यालाच मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी!

 MSIDCचा सावळा गोंधळ; आंदोलनकर्त्यालाच मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी!पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील अपघातांविरोधातील आंदोलनाचा सहावा दिवस; सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट


प्रतिनिधी:विनायक साबळे
 

शिरूर : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाढते अपघात आणि होत असलेल्या जीवितहानीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालयात मागील सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी आंदोलनस्थळी भेट देत आपली कार्यतत्परता दाखवली. मात्र, आंदोलनकर्त्याला दिलेल्या पत्रातील मजकुरामुळे MSIDCच्या कारभाराचा अजब नमुना समोर आला आहे.


MSIDCने आंदोलनकर्त्याला दिलेल्या पत्रात पुणे–शिरूर प्रकल्पासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली की आंदोलनकर्त्यालाच प्रशासनासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


पुणे–अहिल्यानगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना रस्ते सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि आवश्यक उपाययोजनांबाबत ठोस कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनातून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर MSIDC अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली. मात्र, आंदोलनकर्त्याच्या मागण्यांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी त्यालाच मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी करणारे पत्र दिल्याने अधिकाऱ्यांच्या सावळ्या गोंधळाची चर्चा सुरू झाली आहे.


विशेष म्हणजे, प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी, अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत पत्रात नेमकी कोणती ठोस कार्यवाही केली जाणार, याचे स्पष्ट उत्तर नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


आंदोलनकर्त्याला मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी करणारे MSIDCचे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments