कर्मवीर जयंती सप्ताहात ‘मनोरंजनातून शिक्षणाकडे’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : विनायक साबळे
कवठे येमाई (ता. शिरूर) : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस्, कवठे येमाई येथे १३९ व्या कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त अरुण वाळुंज टॉक्स व्यासपीठाच्या माध्यमातून ‘जादूचे प्रयोग – मनोरंजनातून शिक्षणाकडे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जादूच्या विविध प्रयोगांचा मनमुराद आनंद घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चित्रपट दिग्दर्शक भरत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जादूगार रोहित कुमार चऱ्होलीकर यांनी विविध आकर्षक जादूचे प्रयोग सादर केले. कबुतराची जादू, रुमालाची जादू यांसह अनेक प्रयोगांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. मनोरंजनासोबतच जादूच्या प्रयोगांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला.
प्राचार्य शिवराम मुंजावडे यांनी जादू ही कोणतीही चमत्कारिक शक्ती नसून हातचलाखी आणि विज्ञानाचा सुरेख संगम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे पाहून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक आणि चित्रपट गीतकार अरुण वाळुंज यांनी ‘राजे छत्रपती’, ‘कट्टी बट्टी’, ‘चांदोबाची आई’, ‘भीमानं संविधान लिव्हलं रं’ आदी गीते सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमास महेंद्र दरवडे, शरद बोंबे, मच्छिंद्रनाथ करंजकर, संतोष सोनवणे, शिल्पा नेहेरे, हेमा कड्डे, सत्यश्री थोरात, शिवराम मुंजावडे, कामिनी गवळी, उज्ज्वला पवार, सखाराम दाभाडे, सविता धसाडे, दर्शना राजगुरू यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments